खानापूर (प्रतिनिधी): शशिकांत जाधव
पुणे जिल्हा शिक्षण मंडळ संचलित इंग्लिश मिडीयम प्री प्रायमरी स्कूल, खानापूर येथे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ मोठ्या उत्साहात आणि आनंदी वातावरणात पार पडला. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व शैक्षणिक प्रगतीला प्रोत्साहन देणारा हा कार्यक्रम उपस्थितांसाठी विशेष आकर्षण ठरला.
कार्यक्रमाचे उद्घाटन माजी सरपंच शरद जावळकर, शशिकांत किवळे (अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस ग्रामीण, खडकवासला), मुख्याध्यापक शिवराम साबळे, वृत्तपत्र लेखक व माजी शिक्षक शशिकांत जाधव, उपसरपंच प्रियांका जावळकर व अंकुश जावळकर यांच्या हस्ते करण्यात आले. विविध स्पर्धांमध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करून त्यांचे कौतुक करण्यात आले. मान्यवरांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत सातत्याने मेहनत करण्याचा संदेश दिला.
प्ले ग्रुप, ज्युनियर व सिनिअर के.जी.च्या चिमुकल्यांनी तसेच महात्मा गांधी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थितांची मने जिंकली. बालकलाकारांच्या आत्मविश्वासपूर्ण सादरीकरणामुळे संपूर्ण सभागृहात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी माजी सरपंच शरद जावळकर, शशिकांत किवळे, माजी शिक्षक व वृत्तपत्र लेखक शशिकांत जाधव, अंकुश जावळकर, सचिन यादव व रोहन जावळकर यांनी विशेष योगदान दिले. प्रमुख पाहुणे म्हणून माजी सरपंच शरद जावळकर, युवक राष्ट्रवादी काँग्रेस ग्रामीणचे अध्यक्ष शशिकांत किवळे, मुख्याध्यापक शिवराम साबळे, शशिकांत जाधव, उपसरपंच प्रियांका जावळकर, माजी उपसरपंच अमित पवार, सामाजिक कार्यकर्ते प्रमोद जावळकर आदी मान्यवर उपस्थित होते.
विभाग प्रमुख अंजना जावळकर, प्रियांका जावळकर व पूजा पवार यांनी कार्यक्रमाचे उत्तम नियोजन केले. आशा निंबाळकर व रूपाली हनमघर यांनी सहकार्य केले. अंजना जावळकर यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला तर पूजा पवार यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमास पालक, ग्रामस्थ व शिक्षणप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवले.







