प्रतिनिधी सागर जगदाळे भिगवन
भिगवण (ता. इंदापूर) येथील साईनाथ शिक्षण प्रसारक मंडळ संचलित आदर्श माध्यमिक विद्यालयाचा विद्यार्थी आदित्य आशिष कुंभार याने जिल्हास्तरीय थाय बॉक्सिंग स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला आहे. या यशामुळे त्याची विभागस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली असून विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
बारामती येथील जिल्हा क्रीडा संकुलात पार पडलेल्या जिल्हास्तरीय स्पर्धेत 61 ते 65 किलो वजन गटात आदित्य कुंभार याने प्रथम क्रमांक मिळविला. या यशाच्या जोरावर त्याची हडपसर, पुणे येथे होणाऱ्या विभागस्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.
आदित्य कुंभार यास प्रशिक्षक गणेश घुले यांचे मार्गदर्शन लाभले. त्याच्या या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. चंद्रकांत खानावरे, अध्यक्ष डॉ. अमोल खानावरे तसेच संस्थेच्या सर्व संचालक मंडळाने अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
ही माहिती विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सुचिता अशोक साळुंके यांनी दिली.










