वेल्हा प्रतिनिधी : दिनेश गायकवाड
वेल्हे बुद्रुक, घेरा येथील तोरणा किल्ल्याच्या डोंगरात राहणाऱ्या सगुणाबाई लखू ढेबे या वृद्ध व निराधार महिलेच्या पशुधनावर बिबट्याने हल्ला केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. रोजच्या उपजीविकेसाठी पशुपालनावर अवलंबून असलेल्या सगुणाबाईंच्या एक दुभत्या गाईला आणि एका बैलाला बिबट्याने ठार केले असून, यामुळे त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

सगुणाबाई डोंगर परिसरात प्राण मुठीत धरून आपले आयुष्य काढत आहेत. गुरे चारण्यासाठी रानात गेली असताना ही दुर्दैवी घटना घडली. ज्या दुभत्या गाईवर त्यांचे आणि कुटुंबाचे पालनपोषण अवलंबून होते, ती गमावल्यामुळे त्यांच्या जीवनाचा मुख्य आधारच तुटला आहे.
या घटनेमुळे संपूर्ण पंचक्रोशीत भीतीचे वातावरण पसरले आहे. नागरिकांकडून वृद्ध सगुणाबाईंबद्दल हळहळ व्यक्त केली जात आहे. ज्या गाई आणि बैलांच्या जीवावर त्या बिनधोक राहत होत्या, तेच आधार आता हिरावले गेल्याने त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.
जनतेची मागणी :
स्थानिक नागरिकांनी वनखाते, समाजकल्याण, महिला व बालकल्याण तसेच पशुवैद्यकीय विभागाने या गरीब आणि निराधार महिलेला तातडीने भरीव मदत करून न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी केली आहे. भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी वनखात्याने परिसरामध्ये योग्य ती पावले उचलून बिबट्याचा बंदोबस्त करावा, असा जोरदार आवाज जनमानसातून उठत आहे.










