आवाज सत्यतेचा, राष्ट्रहिताचा!

आवाज सत्यतेचा, राष्ट्रहिताचा!

कर्मयोगी शंकररावजी पाटील कारखान्याकडून शेतकरीहितास सर्वोच्च प्राधान्य – हर्षवर्धन पाटील उच्चांकी रु. 3350 ऊसदर घोषणेनिमित्त हर्षवर्धन पाटील व बाबुराव बोत्रे पाटील यांचा सत्कार


इंदापूर, प्रतिनिधी सागर जगदाळे 

 

कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखाना सहयोग ओंकार शुगर अँड डिस्टिलरी लि.कडून शेतकरीहिताला सर्वोच्च स्थान देत चालू गळीत हंगामात उच्चांकी रु. 3350 प्रति टन ऊसदर जाहीर करण्यात आला आहे. “कारखान्याचा अडचणीचा काळ आता मागे पडला असून आगामी काळात दरवर्षी शेतकऱ्यांना सर्वाधिक दर देण्याची परंपरा कायम राहील,” असे गौरवोद्गार कारखान्याचे व राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केले.

महात्मा फुलेनगर (बिजवडी), ता. इंदापूर येथे आयोजित शेतकरी सभासद सुसंवाद कार्यक्रमात बोलताना त्यांनी ऊसदराबद्दल महत्त्वपूर्ण घोषणांसह कारखान्याच्या विकास प्रवासाचा आढावा घेतला. या प्रसंगी उच्चांकी दर दिल्याबद्दल कारखान्याचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील व ओंकार शुगर ग्रुपचे अध्यक्ष बाबुराव बोत्रे पाटील यांचा सभासद शेतकरी, कंत्राटदार यांच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात कर्मयोगी श्रद्धेय शंकररावजी पाटील उर्फ भाऊ यांच्या प्रतिमापूजनाने झाली. यावेळी नीरा-भीमा कारखान्याच्या अध्यक्षा भाग्यश्री पाटील, ओंकार ग्रुपच्या रेखाताई बोत्रे पाटील उपस्थित होत्या.

राजकीय अडथळ्यांचा उल्लेख

आपल्या भाषणात हर्षवर्धन पाटील म्हणाले,

“1985-86 पासून कारखान्याच्या उभारणीत अडचणी येत होत्या. 1995 मध्ये मंत्रिमंडळात असताना आम्ही कारखान्याला 9.50 कोटींचे शासकीय भांडवल मिळवून दिले. 2012 नंतर मात्र सलग तीन निवडणुकांत राजकीय अडचणी आल्या, विरोधकांनी कारखान्यांवर टीका केली. पण राजकीय पाठबळ नसतानाही आम्ही डगमगलो नाही. आता परिस्थिती बदलली असून काळजीची गरज नाही.”

जिल्हा बँकेकडून कारखान्यांना दिल्या जाणाऱ्या उच्च व्याजदरावरही त्यांनी टीका केली.

“एनसीडीसी 8 टक्के दराने कर्ज देते, मग जिल्हा बँक 11–11.30 टक्के व्याज का लावत आहे?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

बाजार समिती व स्थानिक राजकारणावरील टीका

इंदापूर बाजार समितीच्या निवडणुकीतील मतपत्रिका मुद्द्याचा उल्लेख करत हर्षवर्धन पाटील म्हणाले–

“2017 मध्ये मतपत्रिका खाऊन निवडून आलेला उमेदवार आज मतचोरीच्या आरोपांची भाषा करतो. बाजार समिती आमच्या काळात सक्षम झाली; फिश मार्केटसाठी कायदाही बदलला. आज तिथली अवस्था काय आहे?”

तसेच भवानीनगर कारखान्यातील अनावश्यक भरती व वाढता पगारबोजा यावरूनही त्यांनी विरोधकांना टोला लगावला.

भविष्यकालीन साखर उद्योगावरील भाष्य

साखरेचा दर प्रति किलो रु. 41 करावा, अशी शिफारस केंद्राला पाठवण्यासाठी राज्य सरकारने मान्यता दिल्याची माहितीही त्यांनी दिली.

बाबुराव बोत्रे पाटील यांची भूमिका

“हर्षवर्धन पाटील यांच्या अभ्यासू नेतृत्वामुळेच कर्मयोगी व ओंकार ग्रुपमध्ये शेतकरीहितासाठी सहयोग निर्माण झाला,” असे म्हणत बाबुराव बोत्रे पाटील यांनी शेतकऱ्यांना आवाहन केले

“आपला सर्व ऊस कारखान्यात द्या; गाळप वाढले तर त्यापेक्षा चांगला दर कोणीही देऊ शकत नाही.”

भाग्यश्री पाटील यांचे मनोगत

“उच्चांकी दर जाहीर केल्याने श्रद्धेय भाऊंचे शेतकऱ्यांना चांगला दर देण्याचे स्वप्न पूर्ण होत आहे,” असे सांगत त्यांनी नीरा-भीमा व कर्मयोगी कारखान्यांच्या गाळप उद्दिष्टांची माहिती दिली.

कार्यक्रमाला मोठी उपस्थिती

या कार्यक्रमाला दोन्ही कारखान्यांचे संचालक, विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, कंत्राटदार, ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रस्ताविक शरद काळे यांनी केले आणि सूत्रसंचालन रघुनाथ पन्हाळकर यांनी केले.

कृषिमंत्र्यांनी दिवाळीला ऊस बिल का दिले नाही?

“कर्मयोगी व निरा-भीमा कारखान्यांनी शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी रु. 100 प्रमाणे ऊस बिल दिले. मग कृषीमंत्री असलेल्या तालुक्याच्या लोकप्रतिनिधींनी छत्रपती कारखान्यातून दिवाळीला ऊस बिल का दिले नाही?” असा थेट सवाल हर्षवर्धन पाटील यांनी उपस्थित केला.

 

शेतकऱ्यांनी ऊस गाळपासाठी घाई करू नये

कर्मयोगी व निराभिमा कारखान्यांच्या कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांनी आपला सर्व ऊस संबंधित कारखान्यांना द्यावा, कोणत्याही शेतकऱ्याचा ऊस शिल्लक राहणार नाही, त्यामुळे गाळपासाठी घाई करू नये, असे आवाहन हर्षवर्धन पाटील व बाबुराव बोत्रे पाटील यांनी केले.


  • 👍
109
कृपया वोट करा

IM NEWSच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!