विंझर वार्ताहर दि १७ : समीर कांबळे
राजगड (वेल्हे) तालुक्यातील विंझर येथे कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी अत्यंत उपयुक्त ठरणाऱ्या ‘महाविस्तार AI ॲप’ या डिजिटल साथीदाराबद्दल नुकतीच व्यापक जनजागृती करण्यात आली. कृषी अधिकारी सचिन निगडे , रमेश बेलेकर,आणि ग्राम महसूल अधिकारी अभय कंक यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत या ॲपचे फायदे आणि ते कसे वापरायचे, याबद्दल सखोल मार्गदर्शन केले.
’महाराष्ट्र शासन, कृषी विभाग’ यांचा हा अभिनव उपक्रम शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावणारा ठरणार आहे.
ॲपचे प्रमुख फायदे आणि वैशिष्ट्ये
कृषी अधिकारी निगडे यांनी स्पष्ट केले की, हे ॲप शेतकऱ्यांसाठी ‘ज्ञानाचा साथी’ आणि ‘प्रगतीचा आधार’ आहे. या ॲपमुळे शेतकऱ्यांना खालीलप्रमाणे अनेक महत्त्वपूर्ण सुविधा एका क्लिकवर उपलब्ध होणार आहेत:
चॅटबॉट ए.आय. सुविधा: कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वापर करून शेतकऱ्यांच्या कोणत्याही प्रश्नांना त्वरित आणि अचूक उत्तरे मिळतील.
पीक सल्ला आणि व्यवस्थापन:
पीक वाढीच्या टप्प्यानुसार तज्ज्ञांचा सल्ला.
कीड आणि रोग ओळख व त्यावर त्वरित उपाययोजना.
खत मात्रा गणक आणि माती व पिकांनुसार खतांचे अचूक गणित.
हवामान आणि तंत्रज्ञान:
हवामानाचा अचूक अंदाज.
हवामानास अनुकूल आधुनिक शेती तंत्रज्ञान.
पीक संरक्षणासाठी वेळेवर माहिती.
बाजारभाव आणि योजना:
सर्व पिकांचे बाजारभाव (जवळच्या बाजारातील माहिती).
विविध शासकीय योजनांसाठी (उदा. महाडीबीटी) अर्ज करण्याची सोय.
इतर महत्त्वपूर्ण सुविधा:
मृदा आरोग्य पत्रिका (Soil Health Card) विषयक माहिती.
गोदाम, औजारे व इतर कृषी संसाधनांची माहिती.
डिजिटल फार्म स्कूल: माहितीपूर्ण व्हिडीओ आणि ऑनलाईन प्रशिक्षणाची सुविधा.
कृषी अधिकारी निगडे यांनी विंझर येथील शेतकऱ्यांना आवाहन केले की, त्यांनी तात्काळ गुगल प्ले स्टोअर वरून किंवा जाहिरातीमधील QR कोड स्कॅन करून हे ॲप डाऊनलोड करावे आणि आधुनिक शेतीच्या या डिजिटल युगात सहभागी व्हावे. या ॲपमुळे शेतकऱ्यांचा वेळ आणि पैसा वाचेल, तसेच उत्पादनात निश्चित वाढ होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.










