भोर (प्रतिनिधी): तबरेज खान
डोंगराळ व दुर्गम भौगोलिक परिस्थिती असलेल्या भोर तालुक्यात सर्पदंशाच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने आरोग्य यंत्रणेला सक्षम करण्याच्या उद्देशाने सर्पदंश व्यवस्थापन विषयक विशेष प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. भोर उपजिल्हा रुग्णालय व भोर तालुका मेडिकल प्रॅक्टिशनर (BTMP) असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने दि. १३ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी २.०० वा. सोनाली गार्डन, भोर येथे ही कार्यशाळा संपन्न झाली. या उपक्रमासाठी आरोग्य तालुका अधिकारी कार्यालयाचे सहकार्य लाभले.
कार्यक्रमाचे उद्घाटन उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आरोग्य तालुका अधिकारी तसेच जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयातील अधिकारी उपस्थित होते. कार्यशाळेचे संपूर्ण नियोजन बीटीएमपीचे अध्यक्ष डॉ. इम्रान खान यांनी केले.
सर्पदंश उपचार क्षेत्रातील अनुभवी व आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त तज्ज्ञ डॉ. सदानंद राऊत यांनी सहभागी डॉक्टर, परिचारक व आरोग्य कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. सर्पदंशानंतर देण्यात येणारे प्राथमिक उपचार, प्रतिविष देण्याची योग्य वेळ, डोस निश्चिती, तसेच गंभीर रुग्णांवरील तातडीची उपचारपद्धती याबाबत त्यांनी सविस्तर माहिती दिली.
“सर्पदंशानंतर भीती न बाळगता योग्य वैद्यकीय उपाय सुरू करणे हीच जीव वाचवण्याची गुरुकिल्ली आहे. वेळेवर उपचार मिळाल्यास बहुतांश रुग्णांचे प्राण वाचू शकतात,” असे डॉ. राऊत यांनी स्पष्ट केले.
कार्यशाळेत भोर तालुका मेडिकल प्रॅक्टिशनर असोसिएशन, NIMA–भोर, IMA–भोर, होमिओपॅथिक डॉक्टर्स असोसिएशन या सर्व वैद्यकीय संघटनांचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच तालुक्यातील शेकडो डॉक्टर, परिचारिका, परिचारक आणि आरोग्य कर्मचारी यांनी सहभाग नोंदवला. पुणे जिल्हा वन्यप्राणी व सर्प रक्षक असोसिएशनचे भोर शहर अध्यक्ष श्री. तबरेज खान यांचीही उपस्थिती होती.
सत्रादरम्यान प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांद्वारे सर्पदंशग्रस्त रुग्णाचे स्थिरीकरण, आपत्कालीन उपचार पद्धती तसेच आवश्यकतेनुसार रेफरल प्रक्रिया यावर मार्गदर्शन करण्यात आले. सहभागी डॉक्टरांनी अनुभवाधारित प्रश्न विचारून प्रशिक्षणाचा लाभ घेतला.
उपजिल्हा रुग्णालयाच्या वतीने सांगण्यात आले की, या कार्यशाळेमुळे भोर तालुक्यातील ग्रामीण आरोग्यसेवा अधिक सक्षम, तातडीने प्रतिसाद देणारी आणि सर्पदंश उपचाराबाबत सजग बनेल. पावसाळ्यात व डोंगराळ भागात घडणाऱ्या सर्पदंश घटनांच्या पार्श्वभूमीवर हे प्रशिक्षण अत्यंत उपयुक्त ठरेल.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. आनंदा कंक यांनी उत्कृष्टपणे केले, तर आभार प्रदर्शन डॉ. इम्रान खान यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, प्रशासनिक कर्मचारी तसेच सर्व वैद्यकीय संघटनांचे सहकार्य मिळाले.







