- भोर प्रतिनिधी – तबरेज खान
भोर : आगामी भोर नगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहर आणि तालुक्यातील राजकारणाला वेग आलेला असताना आज एक मोठी राजकीय घडामोड घडली आहे. भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि भोरचे माजी उपनगराध्यक्ष श्री. रामचंद्र आवारे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मध्ये प्रवेश केला आहे.
आवारे यांच्यासह त्यांच्या पत्नी सौ. निर्मला आवारे, ज्या मागील पंचवार्षिक काळात नगराध्यक्षा म्हणून कार्यरत होत्या, त्यांनी देखील राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. त्यांचा हा निर्णय भोर शहरातील राजकीय समीकरणांमध्ये मोठे उलथापालथ घडवणारा ठरू शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
सदर प्रवेश सोहळ्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आणि स्थानिक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी आवारे दाम्पत्यांसोबतच शिक्षण मंडळाचे माजी उपसभापती गजानन शेटे, भाजप कामगार आघाडीचे बाळा शेटे, स्वप्निल तारू, प्रथमेश गाढवे, माजी नगरसेविका उल्हाळकर, चेतन उन्हाळकर यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
भोर शहर आणि परिसरातील राजकारणावर या प्रवेशाचा थेट परिणाम होण्याची शक्यता आहे. गेल्या काही वर्षांपासून आवारे दाम्पत्यांनी भाजपच्या माध्यमातून भोर शहरात मजबूत जनसंपर्क आणि संघटन उभारले होते. मात्र, सध्याच्या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या हालचालींमुळे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कडे झुकते माप दिले आहे.
या घडामोडीनंतर भाजपला भोर शहरात मोठा धक्का बसल्याचे मानले जात असून, राष्ट्रवादी काँग्रेससाठी हा प्रवेश एक मोठा बळ ठरणार आहे. आगामी निवडणुकीत या घडामोडींचा नेमका परिणाम काय होईल, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.







