आवाज सत्यतेचा, राष्ट्रहिताचा!

आवाज सत्यतेचा, राष्ट्रहिताचा!

महाराष्ट्राच्या राजकारणातील एका पर्वाला पूर्णविराम लोकनेतृत्वाचा बुलंद आवाज शांत; राजगड तालुक्यात सर्वपक्षीय शोकसभा


महाराष्ट्राच्या राजकारणात परखडपणा, ठाम निर्णयक्षमता आणि सामान्य जनतेशी थेट नाळ जोडणारे नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनाने राज्याच्या राजकीय व सामाजिक जीवनात मोठी पोकळी निर्माण झाल्याची भावना व्यक्त होत आहे.

स्पष्ट भूमिका, प्रशासकीय अनुभव आणि विकासाभिमुख दृष्टिकोन हे दादांच्या राजकारणाचे प्रमुख वैशिष्ट्य होते. मतभेद आणि टीका होत असतानाही त्यांच्या कार्यक्षमतेवर, निर्णयक्षमतेवर आणि महाराष्ट्राप्रती असलेल्या बांधिलकीवर कधीही प्रश्नचिन्ह उभे राहिले नाही, अशी प्रतिक्रिया विविध स्तरांतून उमटत आहे.

दादांचे जाणे ही केवळ एका व्यक्तीची हानी नसून, ठाम विचारांवर उभ्या असलेल्या राजकारणाची मोठी वैचारिक पोकळी असल्याचे अनेक मान्यवरांनी नमूद केले. या पार्श्वभूमीवर राजगड तालुक्यात सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन करण्यात आले असून, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

ही शोकसभा शुक्रवार, ३० जानेवारी रोजी दुपारी १ वाजता लक्ष्मी मंगल कार्यालय, कोंढवळे (ता. राजगड, जि. पुणे) येथे होणार आहे. या सभेत दादांच्या कार्याचा, नेतृत्वाचा आणि महाराष्ट्राच्या जडणघडणीतील योगदानाचा गौरव करण्यात येणार असून, भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येणार आहे.

“आवाज शांत झाला असला, तरी विचार थांबणार नाही,” अशा शब्दांत नागरिकांकडून आपल्या भावना व्यक्त केल्या जात असून, दादांचे कार्य व विचार पुढील पिढ्यांना प्रेरणा देत राहतील, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.


  • 👍
102
कृपया वोट करा

IM NEWSच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!