आवाज सत्यतेचा, राष्ट्रहिताचा!

आवाज सत्यतेचा, राष्ट्रहिताचा!

खेडशिवापूर–खानापूर गटात ‘नारीशक्ती’चा त्रिकोणी संघर्ष; मतदारांमध्ये संभ्रम की परिवर्तनाची लाट?


पानशेत वार्ताहर | समीर कांबळे

आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचे बिगुल वाजण्यापूर्वीच खेडशिवापूर–खानापूर गटात राजकीय वातावरण तापले असून, यंदाची लढत विशेष चर्चेचा विषय ठरत आहे. या गटातून दोन बलाढ्य राजकीय घराण्यांतील महिला उमेदवार आणि एक सर्वसामान्य कुटुंबातून पुढे आलेली उमेदवार आमनेसामने ठाकल्याने ‘नारीशक्ती’चा थेट त्रिकोणी संघर्ष रंगला आहे. पूजाताई नवनाथदादा पारगे, रुपालीताई रमेशबापू कोंडे आणि प्रियंकाताई उमेशदादा सुर्वे यांच्या उमेदवारीमुळे संपूर्ण परिसरात राजकीय हालचालींना वेग आला आहे.

दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

राष्ट्रवादी काँग्रेसच्या पूजाताई नवनाथदादा पारगे या माजी जिल्हा परिषद सदस्य नवनाथ पारगे यांच्या कार्याचा वारसा पुढे नेत आहेत. गेल्या दहा वर्षांत झालेली विकासकामे, मजबूत जनसंपर्क आणि अजित पवार यांच्यावरील निष्ठा हा त्यांच्या प्रचाराचा कणा मानला जात आहे.

शिवसेनेच्या रुपालीताई रमेशबापू कोंडे या शिवसेना जिल्हाप्रमुख रमेशबापू कोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली मैदानात उतरल्या आहेत. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवगंगा खोऱ्यातील प्रलंबित प्रश्नांवर झालेले निर्णय, विकासकामे आणि शासकीय योजना तळागाळात पोहोचवल्याचा दावा त्यांच्या प्रचारात ठळकपणे मांडला जात आहे.

तर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या प्रियंकाताई उमेशदादा सुर्वे या ‘मशाल’ चिन्हावर निवडणूक लढवत असून, निष्ठावंत शिवसैनिकांची फळी आणि उमेश सुर्वे यांचे संघटन कौशल्य ही त्यांची मोठी ताकद आहे. सोमनाथ (आबा) लांडगे यांच्या नेतृत्वाखालील कार्यकर्त्यांची साथ मिळत असल्याने त्यांच्या प्रचाराला वेग आला आहे. शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विचारांचा वारसा जपत परिवर्तनाची लाट असल्याचा दावा या गटाकडून करण्यात येत आहे.

गावोगावी चर्चेला उधाण

खेडशिवापूर व खानापूर परिसरातील चावडी, चौक आणि नाक्यानाक्यावर या त्रिकोणी लढतीचीच चर्चा आहे. ‘विकासकामांचा अनुभव’, ‘सत्ताधारी पक्षाची ताकद’ की ‘निष्ठेची लढाई’—यापैकी नेमके काय निर्णायक ठरणार, याबाबत मतदारांमध्ये उत्सुकता आहे. विशेषतः तरुण आणि महिला मतदार या तिन्ही उमेदवारांकडे बारकाईने पाहत आहेत.

निवडणुकीचे कळीचे मुद्दे

शिवगंगा खोऱ्यातील प्रलंबित प्रश्न, ग्रामीण भागातील रस्ते, पाणीपुरवठा, आरोग्य व शिक्षण सुविधा, तसेच महिलांसाठीच्या योजनांची अंमलबजावणी हे यंदाच्या निवडणुकीतील प्रमुख मुद्दे ठरणार आहेत. विकासकामे विरुद्ध निष्ठा, असा थेट सामना या निवडणुकीत पाहायला मिळणार असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे.

या ‘काटे की टक्कर’ लढतीत खेडशिवापूर–खानापूरची जनता कोणाच्या गळ्यात विजयाची माळ घालणार, हे येणारा काळ ठरवेल. मात्र, तीनही रणरागिणींच्या उमेदवारीमुळे यंदाची निवडणूक अत्यंत चुरशीची आणि लक्षवेधी ठरणार, हे निश्चित.


  • 👍
102
कृपया वोट करा

IM NEWSच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!