वेल्हे | प्रतिनिधी राजेंद्र रणखांबे
मौजे निगडे (ता. वेल्हे) येथील भीमनगर वसाहतीसाठी मंजूर झालेले सौर हायमास्ट दिवे वसाहतीत न बसवता चक्क ग्रामदैवताच्या मंदिर परिसरात बसवण्यात आल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. वसाहतीतील अंधार दूर करण्यासाठी शासनाकडून मंजूर झालेला हा प्रकाश दुसरीकडेच वळवण्यात आल्याने भीमनगरमधील नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. या प्रकरणी ग्रामसेवक, स्थानिक ग्रामपंचायत सदस्य आणि संबंधित ठेकेदार यांनी संगनमताने भीमनगरला डावलल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला असून, संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.
नेमकी घटना काय?
शासकीय निधीतून भीमनगर (केळद) या नावाने दोन सौर हायमास्ट दिवे मंजूर करण्यात आले होते. याबाबत रीतसर वर्क ऑर्डर असतानाही ग्रामसेवक चव्हाण आणि ग्रामपंचायत सदस्य बावळेकर यांनी वसाहतीतील रहिवाशांना विश्वासात न घेता हे दिवे अन्य ठिकाणी बसवल्याचा आरोप करण्यात येत आहे. विशेष म्हणजे, भीमनगरमधील अंधार दूर करण्यासाठी मंजूर झालेला निधी आणि सुविधा वसाहतीऐवजी मंदिर परिसरात वापरल्याने भीमनगरमधील नागरिकांचा हक्क हिरावून घेतल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.
दोषींची टोलवाटोलवी; अखेर कबुली
या प्रकरणाची चौकशी करताना आणि ग्रामस्थांनी जाब विचारल्यानंतर सुरुवातीला संबंधितांनी एकमेकांकडे बोट दाखवत जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केल्याचे सांगण्यात आले.
ग्रामसेवक: “माझा याच्याशी काही संबंध नाही,” असे सांगत सदस्याकडे जबाबदारी ढकलली.
सदस्य बावळेकर: सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली; मात्र कायदेशीर कारवाईचा इशारा मिळताच चूक झाल्याचे मान्य केले.
ठेकेदार लोंढे: सुरुवातीला अरेरावीची भाषा करणाऱ्या ठेकेदाराने पत्रकार व ग्रामस्थांच्या प्रश्नांना उत्तर देताना अखेर आपली जबाबदारी स्वीकारली.
भीमनगरला डावलल्याचा गंभीर आरोप
“आमच्या हक्काचा प्रकाश जाणीवपूर्वक हिरावून घेण्यात आला आहे. हा प्रकार केवळ कामातील चूक नसून भीमनगरच्या विकासाला डावलण्याचा प्रकार आहे,” अशा भावना भीमनगरमधील रहिवाशांनी व्यक्त केल्या. वस्तीचा उल्लेख असलेल्या वर्क ऑर्डरचे उल्लंघन करून निधीचा विनियोग चुकीच्या ठिकाणी करणे हा प्रशासकीय गुन्हा असल्याचेही ग्रामस्थांनी सांगितले.
ग्रामस्थांच्या ठाम मागण्या
भीमनगरमधील नागरिकांनी प्रशासनाकडे पुढील मागण्या केल्या आहेत—
वसाहतीसाठी मंजूर झालेले सौर हायमास्ट दिवे तात्काळ भीमनगरमध्ये स्थलांतरित करून कार्यान्वित करावेत.
कर्तव्यात कसूर करणाऱ्या ग्रामसेवकावर आणि मनमानी करणाऱ्या सदस्यावर प्रशासकीय कारवाई करण्यात यावी.
नियमबाह्य काम करणाऱ्या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्यात यावे.
स्थानिक नागरिक माने आणि सकपाळ परिवाराच्या वतीने सांगण्यात आले की,
“जर या दोषींवर आज कठोर शासन झाले नाही, तर भविष्यात भीमनगरच्या निधीवर डल्ला मारण्याचे धाडस कोणाचेही होईल. आम्हाला न्याय मिळेपर्यंत आम्ही हा लढा सुरूच ठेवू.”
दरम्यान, या प्रकरणाची तात्काळ चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून जोर धरू लागली आहे.










