जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजगड तालुक्यातील राजकीय चित्र आता पूर्णपणे स्पष्ट झाले असून यावेळी महायुतीमध्येच थेट लढत होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि भारतीय जनता पार्टी यांच्यात सरळ सामना रंगणार असून, आमदार शंकर मांडेकर आणि माजी आमदार संग्राम थोपटे यांच्यातील प्रतिष्ठेची लढाई तालुक्याच्या राजकारणाचे भवितव्य ठरवणार आहे.
महायुतीतच लढत होत असल्याने दोन्ही पक्षांत इच्छुक उमेदवारांची संख्या मोठी आहे. त्यामुळे उमेदवारी वाटप करताना नाराजांचे प्रमाण वाढण्याची शक्यता असून, याचा फटका दोन्ही बाजूंना बसू शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
दरम्यान, दुसऱ्या बाजूला महाराष्ट्र नवनिर्माण सेना, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) यांनी एकत्र येत तिरंगी लढतीसाठी रणनीती आखली आहे. या तिन्ही पक्षांमध्ये उमेदवारीबाबत आतापर्यंत तीन वेळा चर्चा झाली असून, वंचित बहुजन आघाडी व इतर घटक पक्षांनाही सोबत घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. ही आघाडी एकत्रितपणे निवडणूक लढल्यास तालुक्यातील गणिते बदलू शकतात, असे जाणकारांचे मत आहे.
एकेकाळी पंचायत समितीवर सलग अनेक वर्षे एकहाती सत्ता असलेल्या काँग्रेसला यावेळी मोठा धक्का बसला आहे. माजी आमदार संग्राम थोपटे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर काँग्रेसमधील बहुतांश पदाधिकारी व कार्यकर्ते भाजपमध्ये सामील झाले. परिणामी, तालुक्यात काँग्रेसकडे सक्षम उमेदवार उरलेले नसून, काँग्रेसची संघटनात्मक ताकद जवळपास संपुष्टात आल्याचे चित्र आहे.
निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून मागील दोन वर्षांपासून सर्वच पक्षांतील इच्छुक उमेदवारांनी व्यापक जनसंपर्क वाढवला आहे. लग्नसमारंभ, अंत्यविधी, दहावी-तेरावी, वाढदिवस, हळदी-कुंकू समारंभ यामध्ये उपस्थिती, शेतकऱ्यांसाठी सवलतीच्या दरात ताडपत्री वाटप, इलेक्ट्रॉनिक वस्तू, सायकली, आरोग्य शिबिरे, मोफत देवदर्शन, रस्त्यांची कामे, तसेच गावोगावी घोंगडी बैठका व क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
आमदार शंकर मांडेकर यांनी तालुक्यातील विविध गावांमध्ये विकास कामांसाठी मोठ्या प्रमाणावर निधी दिला असून रस्ते, पाणीपुरवठा, वीज आदी कामे सुरू आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मधील कार्यकर्त्यांचे मनोबल वाढले असून पंचायत समिती ताब्यात घेण्यासाठी ते सज्ज झाले आहेत. मांडेकर स्वतः गावोगावी बैठक घेत संघटना मजबूत करत आहेत.
दुसरीकडे, माजी आमदार संग्राम थोपटे हे भाजपमधील जुने व नव्याने प्रवेश केलेले कार्यकर्ते यांना एकत्र आणत पक्षबांधणी करताना दिसत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून मतदारसंघातील विविध भागांत विकास निधी आणून कामे सुरू असल्याचा दावा भाजपकडून केला जात आहे. कोणत्याही परिस्थितीत पंचायत समिती भाजपच्या ताब्यात आणण्याचा निर्धार थोपटे यांनी केला आहे.
एकूणच, महायुतीतील सरळ लढत, इच्छुकांमधील नाराजी आणि तिसऱ्या आघाडीची तयारी यामुळे यावेळी राजगड तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक अत्यंत चुरशीची आणि लक्षवेधी ठरणार आहे.







