विंझर प्रतिनिधी : राजेंद्र रणखांबे
राजगड : मालवली (ता. राजगड) येथील ड्रीमलँड इंग्लिश स्कूल येथे आयोजित ‘आनंदी बाजार’ उपक्रमास नागरिक व पालकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
विश्व फाउंडेशन संचलित ड्रीमलँड इंग्लिश स्कूलच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आला. या आनंदी बाजाराचे उद्घाटन माजी पंचायत समिती सदस्य संतोष दसवडकर यांच्या हस्ते करण्यात आले. विद्यार्थ्यांचे व्यावहारिक ज्ञान वाढावे, दैनंदिन आहारात वापरल्या जाणाऱ्या शेतमाल व फळभाज्यांची ओळख व्हावी, तसेच अर्थव्यवहाराची गोडी निर्माण व्हावी, या उद्देशाने आनंदी बाजाराचे आयोजन करण्यात आले होते.
या उपक्रमात विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या व शेतातून आलेल्या वस्तूंची विक्री करून खरेदी-विक्रीचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. पैशांचे नियोजन, व्यवहारातील संवादकौशल्य, तसेच बचतीचे महत्त्व यांचे धडे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कृतीतून मिळाले.
यावेळी संस्थेच्या संचालिका सुप्रिया दसवडकर, मनसे तालुका अध्यक्ष दिगंबर चोरघे, राजू झांजे, विकास भिकुले, संग्राम दसवडकर, प्रथमेश दसवडकर, प्रीतेश दसवडकर, संदीप सरपाले, माजी सरपंच अशोक चोरघे, दत्ता शेंडकर, प्राचार्य तृप्ती शिळीमकर, तसेच शिक्षिका व कर्मचारीवर्ग, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या उपक्रमाचे पालकांनी विशेष कौतुक केले.







