आवाज सत्यतेचा, राष्ट्रहिताचा!

आवाज सत्यतेचा, राष्ट्रहिताचा!

रस्त्याच्या कामातील प्रशासकीय दिरंगाईविरोधात गावकऱ्यांचे टाळ वाजवत शांततामय आंदोलन कांबरे खे.बा.–गराडे खिंड रस्ता तातडीने सुरू करण्याची मागणी


 

भोर तालुक्यातील कांबरे खे.बा. ते गराडे खिंड हा अत्यंत महत्त्वाचा आणि पूर्णपणे नवीन रस्ता असून, या रस्त्यासाठी लागणारी जमीन वनविभागाच्या अखत्यारीत होती. अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर वनविभागाकडून आवश्यक परवानगी मिळाली असतानाही, जिल्हा परिषद व पंचायत समितीकडून वनविभागाकडे आवश्यक प्रस्ताव सादर न केल्यामुळे प्रत्यक्ष रस्त्याचे काम अद्याप सुरू झालेले नाही. या प्रशासकीय दिरंगाईमुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

या पार्श्वभूमीवर भागवत एकादशीचे औचित्य साधत संभाजी ब्रिगेडच्या वतीने गावकऱ्यांसह भोर पंचायत समिती कार्यालयात टाळ वाजवत, अभंग म्हणत शांततामय आंदोलन करण्यात आले. आंदोलनाच्या माध्यमातून प्रशासनाचे लक्ष या रखडलेल्या रस्त्याच्या कामाकडे वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला.

कांबरे खे.बा.–गराडे खिंड रस्त्याबाबत संभाजी ब्रिगेडच्या वतीने गेल्या तीन ते चार वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा सुरू असून, वनविभागाची परवानगी मिळूनही केवळ प्रशासकीय स्तरावरील निष्क्रियतेमुळे काम सुरू होत नसल्याबाबत आंदोलनादरम्यान तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त करण्यात आली.

यावेळी बोलताना संभाजी ब्रिगेडचे पुणे जिल्हाध्यक्ष सिद्धार्थ कोंढाळकर यांनी सांगितले की, “हा रस्ता पूर्ण झाल्यास भोर आणि पुरंदर हे दोन तालुके थेट जोडले जातील. नसरापूर व सासवड ही प्रमुख गावे एकमेकांशी जोडली गेल्याने दळणवळण अधिक सुलभ होईल. याचा फायदा शेतकरी, विद्यार्थी, कामगार आणि व्यापाऱ्यांना होणार असून, रोजगाराच्या संधी वाढतील व स्थानिक व्यापाराला मोठी चालना मिळेल.”

आंदोलनाची दखल घेत पंचायत समिती भोर येथील गटविकास अधिकाऱ्यांनी तात्काळ पाठपुरावा करून संबंधित प्रस्तावास मान्यता दिल्याचे आंदोलनकर्त्यांना सांगितले. तसेच बांधकाम विभागाचे कुलकर्णी साहेब यांनी सदर प्रस्ताव पुढील कार्यवाहीसाठी तत्काळ पाठविण्यात आल्याची माहिती दिली.

या आंदोलनात संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सिद्धार्थ कोंढाळकर, सागर शिंदे (सरपंच), दशरथ मांढरे (उपसरपंच), दादासाहेब शेलार (वनसमिती अध्यक्ष), महादेव चव्हाण, लक्ष्मण यादव, योगेश शिंदे, रोहित खिरिड, निलेश कोंढाळकर, प्रितम कोंढाळकर, धनंजय मालुसरे, सतीश गायकवाड यांच्यासह मोठ्या संख्येने गावकरी उपस्थित होते.

दरम्यान, लवकरात लवकर प्रत्यक्ष रस्त्याचे काम सुरू झाले नाही, तर संभाजी ब्रिगेड व गावकरी पंचायत समिती, भोर येथे ठिय्या आंदोलन करतील, असा इशाराही यावेळी आंदोलनकर्त्यांच्या वतीने देण्यात आला आहे.


  • 👍
107
कृपया वोट करा

IM NEWSच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!