गिरणी कामगारांना त्यांच्या हक्काचे घर मुंबईमध्येच मिळाले पाहिजे, शेलू व वांगणीसारख्या ठिकाणी जबरदस्तीने घरे स्वीकारण्यास भाग पाडणारी फसवणूक थांबवली पाहिजे आणि सरकारने लवकरात लवकर घरांची सोडत जाहीर करावी, अन्यथा नसरापूर येथे रस्ता रोको आंदोलन छेडण्यात येईल, असा स्पष्ट इशारा राष्ट्रीय मिल मजदूर संघ व गिरणी कामगार संयुक्त लढा समितीच्या वतीने देण्यात आला. हा निर्धार शनिवारी (दि. २७) नसरापूर येथील कुंभारकर लॉन्समध्ये झालेल्या भव्य जाहीर सभेत व्यक्त करण्यात आला.
भोर व राजगड तालुक्यासह परिसरातील मोठ्या संख्येने गिरणी कामगार या सभेला उपस्थित होते. सभेचे सूत्रसंचालन तालुकाप्रमुख दशरथ गोळे यांनी केले. आपल्या भाषणात त्यांनी सरकारवर टीका करत स्पष्ट शब्दांत सांगितले की, “गिरणी कामगारांना मुंबईतच घरे मिळाली पाहिजेत. वर्षानुवर्षे प्रलंबित असलेली घरांची सोडत सरकारने तातडीने काढली नाही, तर नसरापूर येथे रस्ता रोको करून सरकारचे लक्ष वेधले जाईल.”
राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे खजिनदार निवृत्ती देसाई यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, गिरणी कामगारांच्या प्रश्नावर सध्या मोठ्या प्रमाणात दिशाभूल केली जात आहे. “आमचा मराठी कामगार आम्ही मुंबईमधून हद्दपार होऊ देणार नाही. शेलू व वांगणी येथे घरे न घेता गिरणीच्या जागेवरच मुंबईमध्ये घरे मिळावीत, ही आमची ठाम भूमिका आहे. गिरणी कामगारांच्या १४ संघटना एकत्र येऊन संयुक्त लढा समितीच्या माध्यमातून हा अन्याय थांबवण्यासाठी निर्णायक लढा उभारत आहेत,” असे त्यांनी सांगितले.
देसाई यांनी काही दलाल व स्वार्थी घटकांकडून भोळ्या-भाबड्या गिरणी कामगारांची फसवणूक होत असल्याचा आरोप करत, अशा प्रवृत्तीविरोधात संघटनेच्या माध्यमातून कायदेशीर व लोकशाही मार्गाने लढा तीव्र केला जाईल, असेही स्पष्ट केले.
राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे उपाध्यक्ष बजरंग चव्हाण यांनी कामगारांना जागरूक राहण्याचे आवाहन करत सांगितले की, “गिरणी कामगारांना चुकीची माहिती देऊन मुंबईबाहेर घरे स्वीकारायला भाग पाडले जात आहे. आम्ही हे थांबवण्यासाठी राज्यभर सभा घेत आहोत. वेळ आली तर रस्ता रोकोसारखी तीव्र आंदोलने करण्यासही मागे-पुढे पाहणार नाही.”
यावेळी अनंत मालप, गिरणी कामगार सेनेचे जिल्हाप्रमुख सत्यवान उभे यांनीही विचार मांडत कामगारांनी कोणत्याही फसव्या आश्वासनांना बळी न पडता संघटनेच्या मार्गदर्शनाखाली एकत्र लढा द्यावा, असे आवाहन केले.
सभेला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पुणे जिल्हाप्रमुख प्रकाश भेगडे, जिल्हा संघटक माऊली शिंदे, वडाळा विधानसभा समन्वयक उज्ज्वला भगत, भोर तालुका प्रमुख (पूर्व) दशरथ गोळे, तालुका प्रमुख (पश्चिम) भरतनाना साळुंके, शैलेश वालगुडे, राजगड तालुकाप्रमुख उमेश नलावडे, महिला तालुका संघटिका निशाताई सपकाळ, युवा तालुकाप्रमुख अनिकेत शिंदे, कामगार सेना तालुकाप्रमुख विजय भिलारे, युवा नेते महेंद्र भोरडे, उपतालुकाप्रमुख एकनाथ तावरे, निलेश मुजुमले, युवासेना जिल्हा सचिव रोहिदास आबा कोंडे, अंकुश चोरगे व सुभाष धोंगडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
वक्त्यांनी स्पष्ट केले की, गिरणी कामगारांचा प्रश्न हा केवळ घरांचा नसून त्यांच्या अस्तित्वाचा व मुंबईतील हक्काचा प्रश्न आहे. त्यामुळे येत्या काळात महाएल्गार आंदोलनाच्या माध्यमातून सरकार व प्रशासनावर दबाव वाढवण्यात येणार आहे.
कार्यक्रमाच्या शेवटी युवा तालुकाप्रमुख अनिकेत शिंदे यांनी आभार मानले. त्यांनी उपस्थित सर्व गिरणी कामगार, पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे आभार व्यक्त करत, आगामी आंदोलनात अधिकाधिक संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले.







