आवाज सत्यतेचा, राष्ट्रहिताचा!

आवाज सत्यतेचा, राष्ट्रहिताचा!

दुर्गम भोर तालुक्यातील दोन ‘आदिती’ंची थेट नासा दौऱ्यासाठी निवड! जिल्हा परिषद शाळेतील प्रतिभेला जागतिक व्यासपीठ—अमेरिकेकडे प्रस्थान


भोर, पुणे: तबरेज खान प्रतिनिधी

पुणे जिल्हा परिषदेच्या ‘पुणे मॉडेल स्कूल’ या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांतर्गत राबविण्यात येणाऱ्या नासा अंतराळ संशोधन केंद्र भेट उपक्रमासाठी भोर तालुक्यातील दोन विद्यार्थिनींची निवड होऊन कर्तृत्वाची नवी शिखरे स्पर्श झाली आहेत. भोरच्या ग्रामीण व दुर्गम भागातील जिल्हा परिषदेच्या शाळेत इयत्ता सातवीत शिक्षण घेणाऱ्या आदिती पारठे आणि आदिती राऊत या दोन विद्यार्थिनी अमेरिकेतील नासा संशोधन केंद्राला भेट देण्यासाठी रवाना झाल्या आहेत.

 

या उपक्रमासाठी यंदा एकूण १६ हजार विद्यार्थ्यांमधून फक्त २५ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. विविध परीक्षांचे चार टप्पे पार करत अंतिम यादी निश्चित करण्यात आली असून त्यात भोर तालुक्यातील दोन विद्यार्थिनींचा समावेश झाल्याने तालुक्याचे नाव अभिमानाने उज्ज्वल झाले आहे.

 

नासा दौऱ्यापूर्वी आदिती पारठे व आदिती राऊत यांनी आपल्या शिक्षकांसह भोरमधील शिवतीर्थ चौपाटी येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे दर्शन घेतले. त्यानंतर कुटुंबीय, नातेवाईक आणि शिक्षकांच्या शुभेच्छांच्या वर्षावात त्या अमेरिकेकडे रवाना झाल्या. प्रवासादरम्यान त्या नासाच्या विविध संशोधन प्रयोगशाळा, वैज्ञानिक प्रक्रिया, रॉकेट-विज्ञान, तंत्रज्ञान विकास आणि अंतराळ मोहिमांबद्दल प्रत्यक्ष माहिती जाणून घेणार आहेत.

 

विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान व संशोधनाची गोडी निर्माण व्हावी, जागतिक स्तरावरील वैज्ञानिक प्रक्रियेची ओळख व्हावी, तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या प्रतिभेला संधी मिळावी, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. पुणे जिल्हा परिषदेमार्फत वर्ष 2025 मध्येही हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडत आहे.

 

हा उपक्रम पुणे जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रभावीपणे राबविण्यात येत असून, जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी हा मार्गदर्शक ठरत आहे. ग्रामीण भागातील दोन विद्यार्थिनींची निवड हा ‘पुणे मॉडेल स्कूल’ उपक्रमाचा यशस्वी नमुना असल्याचे मत शिक्षक व पालक व्यक्त करत आहेत.

 

भोर तालुक्यातून थेट नासापर्यंतचा हा प्रवास अनेक ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार असून भविष्यात विज्ञान क्षेत्रात उज्ज्वल वाटचाल करण्याची संधी या विद्यार्थिनींसमोर खुली झाली आहे.


  • 👍
102
कृपया वोट करा

IM NEWSच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!