नसरापूर(ता. भोर) : प्रतिनिधी विलास धोंगडे
‘विजय मुकुंद आठवले विद्यालय, माळेगाव-नसरापूर’ येथील विद्यार्थ्यांनी खऱ्या अर्थाने संवेदनशीलतेचा आणि सामाजिक जबाबदारीचा आदर्श घालून दिला आहे. विद्यालयातील इयत्ता पाचवीतील दोन विद्यार्थी — कु. साहिल गाडेकर आणि कु. संस्कार झेंडे — हे दिवाळी सुट्टीत फटाक्याचा स्फोट होऊन गंभीररित्या भाजले होते. दोन्ही विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती कठीण असल्याचे समजताच, विद्यालयातील विद्यार्थ्यांनी स्वतःहून त्यांच्या मदतीसाठी पुढाकार घेतला.
मुख्याध्यापिका सौ. रेवती पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांनी मिळून आर्थिक मदतीचे आवाहन केले. त्याला विद्यार्थ्यांनी मोठा प्रतिसाद देत स्वतःकडून व परिसरातील नागरिकांकडून निधी गोळा केला. या उपक्रमातून तब्बल अठरा हजार रुपयांची मदत उभी राहिली.
मंगळवार, दि. 11 नोव्हेंबर 2025 रोजी मुख्याध्यापिका सौ. रेवती पवार, जेष्ठ शिक्षक श्री. विक्रम कदम, तसेच अन्य शिक्षक व कर्मचारी यांनी हॉस्पिटलमध्ये भेट देऊन जखमी विद्यार्थ्यांच्या पालकांकडे मदतीची रक्कम प्रत्यक्ष सुपूर्द केली. या वेळी पालकांच्या डोळ्यांत कृतज्ञतेचे अश्रू दाटले होते.
या विद्यार्थ्यांच्या संवेदनशील कृतीचे सर्वत्र कौतुक होत आहे. “लहान वयात समाजासाठी वाटणारी जबाबदारी आणि सहवेदनेची भावना हीच खरी शिक्षणाची किंमत आहे,” असे मत पालक व स्थानिक नागरिकांनी व्यक्त केले.
शिक्षकांनी प्रेरणा दिली, पण पुढाकार विद्यार्थ्यांनी घेतला — हीच या घटनेची विशेष बाब ठरली.
आठवले विद्यालयाच्या या उपक्रमाने दाखवून दिले आहे की, माणुसकीची शिकवण पाठ्यपुस्तकांतून नाही तर कृतीतूनच मिळते.







