आवाज सत्यतेचा, राष्ट्रहिताचा!

आवाज सत्यतेचा, राष्ट्रहिताचा!

वेल्हे-राजगडमध्ये निवडणुकीची धग वाढली! थोपटे विरुद्ध मांडेकर समर्थक आमनेसामने; प्रतिष्ठेची लढाई रंगात


विंझर वार्ताहर 

समीर कांबळे

सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या वेल्हे (राजगड) तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. तालुक्यातील सत्ता टिकवण्याच्या प्रयत्नांना वेग आला असून, परिवर्तन घडवून आणण्यासाठी विरोधकांनीही कंबर कसली आहे. त्यामुळे यंदाची निवडणूक केवळ औपचारिक न राहता, दोन बलाढ्य गटांमध्ये प्रतिष्ठेची आणि वर्चस्वाची थेट लढाई होण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत.

तालुक्यातील राजकारणात माजी आमदार संग्रामदादा थोपटे यांच्या अनुभवी नेतृत्वाखालील समर्थक गट आणि विद्यमान आमदार शंकरभाऊ मांडेकर यांच्या पाठीशी उभ्या असलेल्या संघटित युवा शक्तीमध्ये जोरदार चढाओढ सुरू आहे. थोपटे समर्थकांचा पारंपरिक प्रभाव आणि मांडेकर समर्थकांची आक्रमक मोर्चेबांधणी यामुळे निवडणूक रंगतदार होणार असल्याचे चित्र आहे. त्यामुळे तालुक्यातील अनेक गावांमध्ये प्रचाराची धडपड वाढली असून, भेटीगाठी, बैठका आणि संघटनात्मक हालचालींना वेग आला आहे.

दरम्यान, निवडणुकीच्या तयारीत सर्वच पक्षांनी आपापली फळी मजबूत करण्यावर भर दिला आहे. अनेक ठिकाणी इच्छुक उमेदवारांनी संपर्क वाढवला असून, गावपातळीवरील समीकरणे जुळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, अद्याप उमेदवारांच्या नावांबाबत सस्पेन्स कायम आहे. कोणत्या गटाकडून कोणत्या जागेसाठी कोणाला संधी मिळणार, याबाबत गोपनीयता पाळली जात असून, उमेदवारी जाहीर होताच तालुक्यात राजकीय घडामोडींना आणखी वेग येण्याची शक्यता आहे.

यंदाच्या निवडणुकीत पारंपरिक प्रचारापेक्षा आधुनिक पद्धतींवर भर राहणार असल्याची चर्चा आहे. सोशल मीडिया, डिजिटल प्रचार, व्हिडिओ संदेश, कार्यकर्त्यांचे नेटवर्क आणि बूथनिहाय नियोजन यावर दोन्ही गटांचे लक्ष केंद्रित झाले आहे. तसेच प्रतिस्पर्ध्याला मात देण्यासाठी गावभेट दौरे, गुप्त बैठकांचे सत्र आणि संघटनात्मक बांधणी याला प्राधान्य दिले जात आहे.

या निवडणुकीतील महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तालुक्यातील तरुण मतदारांचा कौल. पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या तरुणाईचा कल कोणत्या बाजूला झुकतो, यावर अनेक जागांचे गणित बदलू शकते. त्यामुळे प्रत्येक गटाकडून तरुणांपर्यंत पोहोचण्यासाठी विशेष नियोजन केले जात असल्याचेही चित्र आहे.

राजकीय विश्लेषकांच्या मते, यंदा वेल्हे तालुक्यात विकासाचे मुद्दे, स्थानिक नेतृत्व, संघटनात्मक ताकद आणि प्रतिष्ठा यांचा मोठा प्रभाव राहणार आहे. जिल्हा परिषदेतील सत्ता कोणाकडे जाते आणि पंचायत समितीवर कोणाचा वरचष्मा राहतो, यावर भविष्यातील तालुक्याची राजकीय दिशा ठरणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे वेल्हे-राजगड तालुक्यातील निवडणूक ही पुणे जिल्ह्यातील चर्चेचा केंद्रबिंदू ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही.


  • 👍
102
कृपया वोट करा

IM NEWSच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!