प्रतिनिधी विलास धोंगडे
पानशेत : दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना उबदार आच्छादन मिळावे आणि त्यांच्या आरोग्याची काळजी घेतली जावी, या उद्देशाने पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या श्री शिवाजी वीर बाजी हायस्कूल वसतिगृहातील विद्यार्थ्यांना ब्लँकेटचे वाटप करण्यात आले. कै. बाबुराव पासलकर प्रतिष्ठानतर्फे संजय पासलकर यांनी आप्तस्वकीयांच्या स्मरणार्थ हा उपक्रम राबवला.
विद्यार्थ्यांशी संवाद साधताना संजय पासलकर म्हणाले,
“छत्रपती शिवाजी महाराजांचे आचार आणि विचार आत्मसात करा. त्यांचा ध्यास, शिस्त, परिश्रम आणि दूरदृष्टी तुमच्या जीवनाला नवे दिशादर्शन करतील.”
त्यांनी पुढे सांगितले की, शिक्षणाची गंगा दुर्गम भागात पोहोचविण्याचे कार्य संस्थेचे संस्थापक कै. बाबुराव घोलप यांनी आयुष्यभर निष्ठेने केले आहे. अंधश्रद्धेला बळी पडू नका, विज्ञानाची कास धरा आणि प्रगतीचा मार्ग स्वतः तयार करा, असा मार्गदर्शक संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत मुख्याध्यापक संजय अहिरे यांनी केले. ब्लँकेट वाटपाबद्दल त्यांनी संजय पासलकरांचे मनःपूर्वक अभिनंदन व आभार मानले.
जेष्ठ साहित्यिक व कवी रमेश तांबे यांनी आपल्या विनोदी व प्रेरणादायी कवितांमधून विद्यार्थ्यांमध्ये हशा, उत्साह आणि चैतन्य निर्माण केले.
वृत्तपत्र लेखक आणि माजी जेष्ठ शिक्षक शशिकांत जाधव, अशोक पासलकर तसेच माजी मुख्याध्यापक शंकर वाल्हेकर यांनीही मनोगत व्यक्त करत उपक्रमाचे उदंड कौतुक केले.
सूत्रसंचालन विद्या शिंदे यांनी केले तर आभार प्रदर्शन भगवान खेडकर यांनी मानले.
कार्यक्रमाचे उत्तम नियोजन विद्या शिंदे, नंदन ठाकरे, आशा कुतवळ, प्रताप विरकर, भगवान खेडकर, शैलेश भालेराव आणि सर्व शिक्षक-शिक्षकेतर सहकाऱ्यांनी केले.
या उपक्रमास विद्यार्थ्यांची मोठी उपस्थिती लाभली.







