प्रतिनिधी – महेश सणस विंझर
राजगड दि 07 : भारतीय स्वातंत्र्य लढ्याला प्रेरणा देणाऱ्या आणि प्रत्येक भारतीयाच्या मनात देशाभिमान जागृत करणाऱ्या राष्ट्रीय गीत ‘वंदे मातरम’ ला १५० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आज एशियन कॉलेज ऑफ सायन्स, कॉमर्स अँड आर्ट्स, वेल्हे येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमात महाविद्यालयातील विद्यार्थी आणि शिक्षक मोठ्या संख्येने एकत्र आले आणि त्यांनी राष्ट्रगीताचे सामूहिक गायन केले. सामूहिक वंदे मातरम गायनाने महाविद्यालयाचे वातावरण भारावून गेले. या गीतातून भारतमातेप्रती असलेली आत्मीयता, समर्पित भावना व स्वातंत्र्याची तेजाळलेली प्रतिमा सर्वांच्या डोळ्यासमोर उभी राहिली. तसेच, भारतीय स्वातंत्र्य संग्रामात बलिदान देणाऱ्या अनेक हुतात्म्यांना या राष्ट्रगीताच्या माध्यमातून आदराने अभिवादन करण्यात आले.
“१५० वर्ष पूर्ण होताना आपण सारे एक होऊया, वंदे मातरम गीत गाऊया…” या प्रेरक संकल्पनेतून हा देशभक्तीपर कार्यक्रम उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थेच्या संस्थापिका अध्यक्षा डॉ. अनिता साप्ते, उपाध्यक्ष आनंद साप्ते, आणि सचिव अनिल साप्ते यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच, महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य प्रा. स्वाती काळे यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला.
या प्रसंगी प्रियांका पवार मॅडम, महेश सणस सर, गौरी रेणुसे, सौम्या माळगावकर, ऋतुजा काळे, गौतम जगताप, आकाश गायकवाड, कार्तिक निंबाळकर, प्रभात पत्रकार, समीर कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.
विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे कार्यक्रमाला एक विशेष ऊर्जादायी आणि प्रेरणादायक वातावरण प्राप्त झाले आणि अखेर “वंदे मातरम! वंदे मातरम!!” या एकाच स्वराने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.








