आवाज सत्यतेचा, राष्ट्रहिताचा!

आवाज सत्यतेचा, राष्ट्रहिताचा!

मढेघाट परिसरात पर्यटकांवर मधमाशांचा भीषण हल्ला; ५६ जण जखमी, ६ जण पुण्यात दाखल महावितरणच्या व्हॉट्सॲप ग्रुपमुळे मदतीला वेग


राजगड प्रतिनिधी : समीर कांबळे

ऐतिहासिक मढेघाट परिसरात निसर्ग पर्यटनासाठी आलेल्या शालेय विद्यार्थ्यांच्या गटावर मधमाशांनी अचानक भीषण हल्ला केल्याची धक्कादायक घटना रविवारी (दि. ४ जानेवारी) दुपारच्या सुमारास घडली. या घटनेत एकूण ५६ जण जखमी झाले असून, त्यापैकी प्रकृती चिंताजनक असलेल्या ६ जणांना तातडीने पुण्यातील भारती हॉस्पिटल येथे हलवण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर सर्व जखमींची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

 

नेमकी घटना काय?

 

मिळालेल्या माहितीनुसार, १० ते १३ वयोगटातील ५६ विद्यार्थी आणि १० प्रशिक्षकांचा एक गट मढेघाट परिसरात निसर्ग पर्यटनासाठी आला होता. दुपारच्या सुमारास अचानक मधमाशांच्या मोहोळाला धक्का बसल्याने संपूर्ण गटावर हल्ला झाला. काही मिनिटांतच परिसरात गोंधळाची स्थिती निर्माण झाली. विद्यार्थ्यांनी जीव वाचवण्यासाठी धावपळ केली. घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे कर्मचारी तसेच केळद परिसरातील ग्रामस्थ मदतीसाठी धावले.

 

कोतवालांचे विशेष सहकार्य

 

या संकटकाळात कोतवाल महेंद्र शिंदे यांनी विशेष सहकार्य करत घटनास्थळी मदतकार्य समन्वयित केले. जखमींना सुरक्षितपणे रुग्णवाहिकांपर्यंत पोहोचवणे, ग्रामस्थांना मार्गदर्शन करणे तसेच प्रशासनाशी तातडीचा संपर्क साधणे यामध्ये त्यांचे योगदान मोलाचे ठरले.

 

प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर नसल्याने संताप

 

जखमी विद्यार्थ्यांना तातडीने ‘प्राथमिक आरोग्य केंद्र, पासली’ येथे नेण्यात आले. मात्र, इतक्या मोठ्या आपत्कालीन परिस्थितीतही तेथे एकही डॉक्टर उपलब्ध नसल्याने पालक व ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला. वेळेवर उपचार न मिळाल्याने शासकीय यंत्रणेच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले.

 

महावितरण कर्मचाऱ्याचे सामाजिक कार्य; ग्रामस्थ मदतीला धावले

 

या घटनेत मावळ भागातील ‘१८ गाव मावळ आपले महावितरण’ या व्हॉट्सॲप ग्रुपने मदतीसाठी महत्त्वाची भूमिका बजावली. महावितरण कर्मचारी सूर्यकांत नारायण शिंदे यांनी ग्रुपवर तातडीचे आवाहन केल्यानंतर अनेक ग्रामस्थ स्वतःच्या चारचाकी वाहनांसह घटनास्थळी पोहोचले. त्यांच्या सहकार्यामुळे जखमींना वेळेत वेल्हा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करता आले.

 

उपचार व सद्यस्थिती

वेल्हा ग्रामीण रुग्णालयात एकूण ३५ जणांवर प्राथमिक उपचार करण्यात आले. यामध्ये १७ मुले, १४ मुली आणि ४ प्रौढांचा समावेश आहे. गंभीर स्वरूपाची लक्षणे दिसून आलेल्या ६ जणांना (२ मुले, १ मुलगी, २ पुरुष व १ महिला) पुढील उपचारांसाठी पुण्यातील भारती हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. जखमींना मळमळ, चक्कर येणे, अंगावर पित्त उठणे व चेहऱ्यावर तीव्र सूज येणे अशी लक्षणे होती.

 

या बचावकार्यात धायरी, खेड शिवापूर व वेल्हा येथील ‘१०८’ रुग्णवाहिकांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. तसेच वेल्हे (राजगड) तहसीलदार निवास ढाणे यांनी तालुका वैद्यकीय अधिकारी अंबादास देवकर यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधून तातडीच्या वैद्यकीय मदतीच्या सूचना दिल्या.

 

प्रशासनाला इशारा

 

या घटनेमुळे पर्यटनस्थळी आपत्ती व्यवस्थापन, प्राथमिक आरोग्य सुविधा व तत्काळ वैद्यकीय सेवांच्या उपलब्धतेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. मढेघाटसारख्या पर्यटनस्थळी कायमस्वरूपी डॉक्टर, आपत्कालीन औषधसाठा व प्रशिक्षित कर्मचारी उपलब्ध ठेवण्याची जोरदार मागणी ग्रामस्थ व पालकांकडून होत आहे.


  • 👍
107
कृपया वोट करा

IM NEWSच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!