राजगड प्रतिनिधी : महेश सणस विंझर
भोर आणि राजगड तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला असून, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अविनाश भोसले आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राजगड तालुका सरचिटणीस विठ्ठल गोरे यांनी आपल्या असंख्य सहकाऱ्यांसह भारतीय जनता पार्टीत ‘स्वगृही’ प्रवेश केला आहे. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा पक्षप्रवेश राष्ट्रवादीसाठी मोठे खिंडार मानले जात आहे.
भाजपचे पुणे जिल्हाध्यक्ष शेखर वढणे यांच्या नेतृत्वाखाली आणि भोर विधानसभेचे माजी आमदार संग्राम दादा थोपटे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा उत्साहात पार पडला. या वेळी भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अविनाश भोसले यांनी यापूर्वी भाजप युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष तसेच जिल्हा उपाध्यक्ष म्हणून काम पाहिले होते. काही महिन्यांपूर्वी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता आणि त्यांच्यावर महत्त्वाच्या जबाबदाऱ्याही सोपविण्यात आल्या होत्या. मात्र, अल्पावधीतच त्यांनी पुन्हा भाजपमध्ये परतण्याचा निर्णय घेत ‘घरवापसी’ केली. भाजपचे विचार, संघटनात्मक बळ आणि विकासाभिमुख धोरणांवर विश्वास ठेवून हा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, राजगड तालुक्यात राष्ट्रवादीची संघटनात्मक जबाबदारी सांभाळणारे तालुका सरचिटणीस विठ्ठल गोरे यांनीही आपल्या सहकाऱ्यांसह भाजपमध्ये प्रवेश केल्याने राष्ट्रवादीच्या गोटात अस्वस्थता निर्माण झाली आहे.
या वेळी बोलताना जिल्हाध्यक्ष शेखर वढणे यांनी, “भोर–राजगड तालुक्यात भाजपची संघटनशक्ती वाढत असून, विकासकामांमुळे कार्यकर्त्यांचा विश्वास भाजपवर अधिक दृढ होत आहे,” असे सांगितले. माजी आमदार संग्राम दादा थोपटे यांनीही, “कार्यकर्त्यांना सन्मान व संधी देणारा पक्ष म्हणून भाजप ओळखला जातो. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत भाजप मजबूत ताकदीने मैदानात उतरेल,” असा विश्वास व्यक्त केला.
या पक्षप्रवेशामुळे भोर–राजगड तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे स्पष्ट दिसत असून, येणाऱ्या निवडणुकांवर याचा थेट परिणाम होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.







